Bhor : भोर तालुक्यातील हातवे बुद्रुक-केतकावणे परिसरातील नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या 17 वर्षीय युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गजानन नामदेव केंद्रे (वय 17, सध्या रा. येवलेवाडी, मूळ गाव नागदरवाडी, जि. नांदेड) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन केंद्रे हा मित्रांसोबत हातवे-केतकावणे येथील नदीपात्र परिसरात गेला होता. त्यावेळी पोहण्यासाठी नदीत उतरला असता पाण्याची खोली व प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला. काही क्षणांतच तो पाण्यात बुडाल्याने उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र यश न आल्याने घटनेची माहिती राजगड पोलीस स्टेशनला देण्यात आली.
माहिती मिळताच राजगड पोलीस स्टेशनमार्फत हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमला तात्काळ पाचारण करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पोलीस प्रशासन व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या रेस्क्यू मोहिमेत तानाजी भोसले, वैभव भोसले, संजय चोरघे, गणेश सपकाळ, संदीप सोलस्कर, प्रतीक महामुनी व योगेश गोपी यांनी सहभाग घेतला. कारवाईदरम्यान राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी औदुंबर नागनाथ आडवाले घटनास्थळी उपस्थित होते व त्यांनी आवश्यक समन्वय साधला.
दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी, ओढे व धरण परिसरात पोहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत असून, पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने अशा दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरताना योग्य खबरदारी घ्यावी व धोकादायक ठिकाणी पोहणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







