पुणे: पुणे (Pune News) जिल्ह्यातील शिरूर तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिरूर आणि आसपासच्या गावांमध्ये गेल्या 20 दिवसांपासून दहशत पसरवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वनविभागाच्या विशेष पथकाने ठार मारले आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये या बिबट्याने 3 निष्पाप लोकांचा बळी घेतला होता. 12 ऑक्टोबर 2025 रोजी 6 वर्षांची शिवन्या बोंबे, 22 ऑक्टोबर रोजी 70 वर्षांच्या भागुबाई जाधव आणि 2 नोव्हेंबर रोजी 13 वर्षांच्या रोहन बोंबे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. सलग झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यांमुळे शिरूर परिसरात प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारल्यानंतर संपूर्ण परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

बिबट्याच्या वाढत्या भीतीमुळे संतप्त ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी आंदोलन केले. नागरिकांचा संताप इतका वाढला होता की, संतप्त जमावाने वनविभागाचे गस्ती वाहन आणि स्थानिक बेस कॅम्पची इमारत पेटवून दिली होती. दरम्यान, नागरिकांचा संताप लक्षात घेऊन वनसंरक्षक (पुणे) आशिष ठाकरे यांनी तातडीने नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची किंवा पकडण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक (नागपूर) यांच्याकडून घेतली.
काल रात्री सुमारे 10.30 वाजता घटनास्थळापासून 400 ते 500 मीटर अंतरावर बिबट्या दिसला. बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला असता, तो यशस्वी झाला नाही. चवताळलेल्या बिबट्याने प्रतिहल्ला सुरू करताच शार्प शूटरने गोळी झाडून त्याला जागीच ठार केले. प्राथमिक तपासानुसार, ठार झालेला बिबट्या अंदाजे 5 ते 6 वर्षे वयाचा नर बिबट होता, अशी माहिती स्पष्ट झाली आहे. या विशेष मोहिमेसाठी रेस्क्यू संस्थेचे डॉ. सात्विक पाठक, शार्प शूटर डॉ. प्रसाद दाभोळकर आणि जुबिन पोस्टवाला यांच्या पथकाने ही महत्वाची कामगिरी केली आहे.







