राहुलकुमार अवचट

Pune News : यवत : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने डिसेंबर महिन्यात यवत गावच्या हद्दीत दोन्ही बाजूंना सुमारे 80 लाईटचे खांब उभारण्यात आले असून त्यावर सुमारे 160 दिवे बसवण्यात आले आहेत. मात्र, मागील 4 महिन्यांपासून वीज जोडणी न झाल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत.
अनेक दिवस उलटूनही परिसरातील हायमास्ट दिवे बंदच असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली असली तरी चार महिने उलटूनही महामार्गावरील दिवे सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
यवत हे पुणे सोलापूर महामार्गावरील एक महत्त्वाचे गाव असून, महामार्ग सुरू होऊन 10 वर्षे झाली तरी समस्यांचे निराकरण पूर्ण झालेले नाही. चौपदरी महामार्ग असूनही रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यासाठी दोन्ही बाजूंना दिवे बसवण्याची मागणी नागरिकांनी सातत्याने केली होती. अखेर दिवे बसवण्यात आले, मात्र ते अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे हे दिवे नेमके कधी सुरू होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे रोहन जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, वीज जोडणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून काम सुरू करण्यात आले होते. मात्र, यवत पाटबंधारे विभागाने काही कारणास्तव काम थांबवले होते. संबंधित कागदपत्रे देण्यात आली असून लवकरच काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
यवत गावात झळाळी मिळणार
यवत गावाच्या परिसरात सुमारे 1 किमी अंतरावर महामार्ग प्रशासनाने पथदिवे बसवले असून दोन्ही बाजूंना मोठे पोल उभारण्यात आले आहेत. हे दिवे सुरू झाल्यास परिसरातील अंधार दूर होऊन यवत गावाला झळाळी मिळणार आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज जोडणीसाठी प्रस्ताव मंजूर झाला असून काम सुरू आहे. येत्या 29 तारखेपूर्वी महामार्गावरील दिवे सुरू करण्यासाठी वीज पुरवठा करण्यात येईल.
दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या हद्दीत डीपी बसवण्याचे काम परवानगीशिवाय सुरू असल्याने ते थांबवण्यात आले होते, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण करून दिवे सुरू करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.







