दौंड, ता. 25 : देशाच्या संरक्षण मंत्रालयात मुलाला नोकरी लावून देतो, असे आमिष (Daund News ) दाखवून एका निवृत्त व्यक्तीची 4 लाख 37 हजार 555 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना दौंडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिक येथील एका संशयित आरोपीविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना फेब्रुवारी 2024 ते सोमवारी (ता. 23) पर्यंत वेताळनगर, दौंड) परिसरात घडली आहे. (Latest Marathi News)

संदीप शंकर शेळके (रा. हनुमान मंदिराजवळ, आंबेडकर नगर, नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नारायण हनुमंत बाबर (वय-66, रा. वेताळनगर, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण बाबर यांचा मुलगा चेतन याला संरक्षण मंत्रालयात नोकरीला लावतो, असे सांगून आरोपी संदीप शंकर शेळके याने बाबर यांचा विश्वास संपादन केला. नोकरीच्या प्रक्रियेसाठी आणि इतर खर्चाच्या नावाखाली आरोपीने बाबर यांच्याकडून वेळोवेळी एकूण 4 लाख 37 हजार 555 रुपये उकळले.
विश्वास बसावा यासाठी आरोपीने चेतन बाबर याच्या नावाचे संरक्षण मंत्रालयाचे बनावट ओळखपत्र आणि खोटी नियुक्ती ऑर्डर तयार करून त्यांना दिली. मात्र, बराच काळ उलटूनही नोकरी मिळत नसल्याने आणि दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे बाबर यांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नारायण बाबर यांनी दौंड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी संदीप शंकर शेळके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318 (4), 336(2), 336(3) नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार ढुके करत आहेत.







