विशाल शिंदे

राजगड: ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर (Pune News) कामासाठी आलेल्या एका मजुराचा मृतदेह कल्याण दरवाजा परिसरातील खोल दरीत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दशरथ शंकर धोत्रे (वय 53, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते किल्ल्यावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसरात काम करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, धोत्रे हे चार दिवसांपूर्वीच इतर 4-5 सहकाऱ्यांसोबत कामासाठी गडावर आले होते. ते गडावरच मुक्कामाला होते. मात्र, बुधवारी मध्यरात्रीपासून ते अचानक बेपत्ता झाले. सुरुवातीला ते आपल्या गावी गेले असावेत, असा अंदाज सहकाऱ्यांनी वर्तवल्याने त्यांचा शोध कोणी घेतला नाही. मात्र, दिवसभर त्यांच्याशी संपर्क न झाल्याने संशय बळावला. सायंकाळच्या सुमारास काही पर्यटकांना कल्याण दरवाजा परिसरातील दरीत एक मृतदेह दिसून आला, त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अध्यक्ष तानाजी भोसले यांनी सहकाऱ्यांसह तातडीने गडावर धाव घेतली. रात्रीच्या वेळी अत्यंत अवघड आणि खोल दरीत उतरून पथकाने शोध मोहीम राबवली आणि मृतदेह बाहेर काढला. या मोहिमेत गणेश सपकाळ, संदीप साळसकर, संजय चोरगे व नाना अवसरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
बचाव मोहिमेनंतर मृतदेह राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी पोलीस हवालदार राजेंद्र गव्हाणे व पोलीस कर्मचारी पवार घटनास्थळी उपस्थित होते. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. धोत्रे यांचा मृत्यू अपघाती आहे की अन्य काही कारण, याचा तपास पोलीस करत असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.







