पुणे: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा आणि खंडाळा (Pune News) परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी वाढली असून प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने काही मोठे निर्णय घेतले आहेत. यंदा सुट्टी जोडून आल्याने मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेषतः लोणावळ्यातील लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट या दोन महत्त्वाच्या ठिकाणी वनविभागाने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन दिवसांसाठी पर्यटकांना प्रवेश बंदी घातली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले असून यामुळे पर्यटकांचा काहीसा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

महामार्ग पोलिसांनी वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अवजड वाहनांच्या प्रवेशावर काही ठराविक वेळेत निर्बंध घातले आहेत. लोणावळ्यातील भुशी धरण आणि कार्ला-भाजे लेणी या भागातही पर्यटकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. शहरातील बहुतांश हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आतापासूनच पूर्णपणे बुक झाली आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी वाढीव कुमक तैनात केली असून काही ठिकाणी एकमार्गी वाहतुकीचा पर्याय वापरला जात आहे. महामार्गावर सातत्याने होणारी गर्दी पाहता पोलिसांनी प्रवाशांना आधीच नियोजित वेळेत घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
हुल्लडबाजी करणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली आहे. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यात येणाऱ्या वाहनांची संख्या पुढील दोन दिवसांत अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रवाशांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.







