पुणे: पुणे कौटुंबिक न्यायालयाने (Pune News) लग्नाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित न होणे, हे हिंदू विवाह कायद्यानुसार लग्न रद्द करण्यासाठी ठोस कारण ठरू शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हे प्रकरण पुण्यातील एका उच्चशिक्षित तरुण-तरुणीचे आहे. नातेवाईकांच्या पुढाकाराने शुभांगी आणि महेश (नावे बदललेली) यांचा विवाह नोंदणीकृत पद्धतीने पार पडला. सुखी संसाराची स्वप्ने घेऊन शुभांगी सासरी आली, मात्र काही दिवसांतच तिला एका कटू सत्याचा सामना करावा लागला. पतीने वारंवार शारीरिक संबंधांसाठी टाळाटाळ केली. अनेक प्रयत्न करूनही पतीकडून प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्याला वैवाहिक जीवनात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर, मानसिक ताण सहन न झाल्याने शुभांगी माहेरी परतली.
न्यायाधीश बी. डी. कदम यांनी कोणतीही ओढाताण न करता महेशचा लेखी जबाब घेतला त्यात त्याने लिहिले कि, “आमच्यामध्ये खरोखरच शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत.” हिंदू विवाह कायद्यानुसार, जर प्रतिवादीने स्वतःची चूक मान्य केली असेल, तर दीर्घ पुराव्यांची आणि उलटतपासणीची गरज उरत नाही. त्यानंतर न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. अपयशी ठरलेल्या नात्यात अडकून राहण्यापेक्षा सन्मानाने वेगळे होणे महत्त्वाचे आहे, हे या निकालातून अधोरेखित होते.







