पाटस टोल नाक्याजवळ चहाचा गाडा लावण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी; यवत पोलीस ठाण्यात 3 महिलांसह 9 जणांवर गुन्हा दाखल

यवत, ता. 20: पाटस टोलनाका परिसरात चहाची टपरी लावण्यावरून 6 ते 7 जणांनी एका 18 वर्षीय तरुणाला व त्याच्या कुटुंबियांना कोयता व काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घटना घडली आहे. याप्रकरणी 3 महिलांसह 9 जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना बुधवारी (ता. 18) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस टोल नाका परिसरात घडली.
ओंकार दिपक भोसले (वय 18, व्यवसाय- शेती रा. अंबिकानगर, पाटस, ता.दौड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार भोसले यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवम देवराम भोसले, चेतन देवराम भोसले, पारूबाई देवराम भोसले, सोनाली देवराम भोसले, राजु भोसले, सारीका जगन्नाथ पवार, अविनाश जगन्नाथ पवार, जगन्नाथ पवार, दाद्या दत्तात्रय खंडाळे, सर्व रा. पाटस अंबिकानगर, ता. दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर फिर्यादी भोसले यांची आई अलका भोसले, लक्ष्मी पवार, महादेव पवार अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस टोल नाका परिसरात फिर्यादी ओंकार भोसले बुधवारी सायंकाळी चहाचा गाडा लावत होते. यावेळी त्या ठिकाणी आरोपी पारूबाई भोसले आल्या व ओंकार भोसले यांना म्हणाल्या की, या ठिकाणी चहाचा गाडा लावायचा नाही या ठिकाणी आम्ही आधी चहाचा गाडा लावायचो. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली.
यावेळी वरील आरोपी यांनी बेकायदा जमाव जमवुन शिवम भोसले याने त्याच्या हातातील कोयता ओंकार याच्या डोक्यात मारला. त्यामुळे ओंकार जखमी झाला. यावेळी फिर्यादी याची आई अलका भोसले, लक्ष्मी पवार, महादेव पवार यांनाही कोयत्याने डोक्यात, कपाळावर मारून आपखुशिने दुखापत केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, फिर्यादी ओंकार भोसले याच्यासह कुटुंबियांना लाकडी काठीने मारून आपखुशिने दुखापत केली तसेच हाताने लाथा बुक्याने मारहान करून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी तीन महिलांसह 9 जणांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 110, 318(1), 189(2), 190, 191(2), 191(3), 115(2), 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाडेकर करीत आहेत.







