पुणे: पुणे (Pune News) शहरामध्ये सायबर चोरट्यांनी सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक लूट केली असून वेगवेगळ्या १३ गुन्ह्यांमध्ये तब्बल 1 कोटी 61 लाख 98 हजार 952 रुपये लुटले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेअर बाजार, ऑनलाईन टास्क आणि भीती दाखवून पैसे उकळण्याच्या प्रकारांचा समावेश आहे. धानोरी परिसरातील एका 39 वर्षीय महिलेला स्टॉक ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी 27 लाख 80 हजार 957 रुपयांचा चुना लावला आहे. वानवडी भागात राहणाऱ्या एका 57 वर्षीय व्यक्तीची देखील यूएसडीटी खरेदीच्या व्यवहारात 27 लाख 83 हजार 744 रुपयांची फसवणूक झाली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

घरबसल्या काम देण्याच्या नावाखाली देखील फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. सिंहगड रोडवरील आनंदनगर भागात एका महिलेला वर्क फ्रॉम होमचे काम देतो असे सांगून 3 लाख 50 हजार 540 रुपयांना लुटले. कोंढवा आणि लोहगाव परिसरात टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून लाखो रुपये उकळले गेले आहेत.
कोथरूडमधील एका 55 वर्षीय महिलेला सायबर गुन्हेगारांनी मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकल्याचे सांगितले. सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून त्यांनी या महिलेकडून 19 लाख 30 हजार रुपये उकळले. कोथरूडमध्येच एका 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला जादा परताव्याचे आमिष दाखवून 11 लाख 67 हजार 558 रुपये लुटले आहेत. वारजे माळवाडी परिसरात एका 44 वर्षीय व्यक्तीला शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून 16 लाख 21 हजार रुपयांना गंडवण्यात आले आहे. हिंगणे आणि वडगाव शेरी भागातही गुंतवणुकीच्या नावाखाली अनुक्रमे 11 लाख 65 हजार आणि 13 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
धायरीतील एका तरुणाला हॉटेल रेटिंग देण्याचे काम सांगून 3 लाख 4 हजार 100 रुपयांचा गंडा घातला आहे. आंबेगाव आणि वाघोली परिसरात संशयास्पद लिंक पाठवून नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे पळवण्याचे प्रकार घडले आहेत.







