पुणे: पुण्यातील येलवाडी परिसरात (Pune News) माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एखाद्याला संकटात मदत करणे आजच्या काळात किती अंगलट येऊ शकते, याचा थरार येलवाडीत पाहायला मिळाला. नशेत तर्रर असलेल्या एका अनोळखी तरुणाला सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी मदत करणाऱ्या एका व्यक्तीला, त्याच्याच मद्यधुंद मित्रांनी बेदम मारहाण करत त्याचे डोकं फोडल्याची घटना घडली आहे.

रात्री ११ च्या सुमारास जितू कैलास गायकवाड हे येलवाडी येथील एका चायनीज सेंटरवर गेले होते. तिथे काही तरुण मद्यप्राशन करून गोंधळ घालत होते. त्यातील एक तरुण नशेमुळे स्वतःवरील नियंत्रण गमावून बसला होता.
माणुसकीच्या नात्याने जितू यांनी त्या तरुणाला दुचाकीवर बसवून त्याच्या घरी पाठवून दिले. मात्र तिथे असलेल्या इतर नशेबाजांना ही ‘मध्यस्थी’ रुचली नाही. “आमच्या मित्राला आमच्यापासून लांब का पाठवलं?” या क्षुल्लक कारणावरून तरुणांनी जितू यांच्यावर हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून न थांबता, आरोपींनी जितू यांचे डोके फोडले. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.





