पुणे: माणुसकीला काळिमा फासणारी (Pune News) एक अत्यंत हृदयद्रावक घटना पुण्याच्या दांडेकर पूल परिसरात घडली आहे. दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका 28 वर्षीय मुलाने किरकोळ वादातून चक्क आपल्या जन्मदात्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत पेटवून दिले. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण पुणे हादरले आहे.

मयत रवींद्र उद्धव भालेराव (61) हे सुतारकाम करून उदरनिर्वाह करत होते. मात्र, रवींद्र आणि त्यांचा मुलगा सागर (28) या दोघांनाही मद्याचे तीव्र व्यसन होते. 7 फेब्रुवारीच्या रात्री सवयीप्रमाणे दोघेही नशेत असताना त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सागरने पेट्रोल वडिलांवर ओतून काडी पेटवली.
वडिलांना आगीच्या ज्वाळांत होरपळताना पाहून सागरला शुद्ध आली आणि त्याने स्वतः आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानेच वडिलांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. 50 टक्क्यांहून अधिक भाजल्यामुळे रवींद्र यांची प्रकृती चिंताजनक होती. पाच दिवस डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण मंगळवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. पर्वती पोलिसांनी आता सागरवर खुनाचा (कलम १०३-१) गुन्हा दाखल केला आहे.







