पुणे: पुणे (Pune News) शहरातून एक दु:खद घटना समोर आली आहे. सोमवार पेठ परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत लागलेल्या आगीत एका तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. मोहित भूपेंद्र शहा (वय 32, रा. दौंड, जि. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. मोहित शहा एका चार्टर्ड अकाउंटंटकडे (CA) नोकरी करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित शहा यांना दारू पिण्याची सवय होती. गुरुवारी रात्री त्यांनी मोठ्या प्रमाणावर मद्यपान केले होते. त्यामुळे त्यांच्या मित्राने त्यांना सोमवार पेठेतील एका हॉटेलमध्ये खोली घेतली आणि रात्री तिथेच थांबायला सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी बराच वेळ झाला तरी मोहित शहा यांनी खोलीचा दरवाजा उघडला नाही. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना धूर येत असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला संपर्क साधला. अग्निशमन दलाचे जवान लगेच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
आतमध्ये मोहित शहा बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले, तसेच लागलेल्या आगीमुळे त्यांचा पायही भाजला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, नशेत असलेल्या मोहित शहा यांनी सिगारेटचे थोटूक गादीवर टाकल्यामुळे आग लागली. आगीच्या धुरामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे निरीक्षक गित्ते यांनी सांगितले.







