पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे येथील बोपोडी भागातील शासकीय जमिनीच्या (Parth Pawar Land Scam) संदर्भात नऊ जणांविरुद्ध फसवणूक आणि जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात (Pune News) आला आहे.

या आरोपींमध्ये यापूर्वीच निलंबित झालेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दिग्विजय पाटील यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.
शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न
आरोपांनुसार, हेमंत गावंडे यांच्या मालकीच्या ‘व्हीजन प्रॉपर्टीज’ आणि ‘अमीडिया’ कंपनीने राज्य सरकारच्या कृषी विभागाची सुमारे ५.५ हेक्टर जागा बेकायदेशीरपणे हडपण्याचा प्रयत्न केला आहे.
‘व्हिसल ब्लोअर’ ते आरोपी
या प्रकरणातील हेमंत गावंडे यांचे नाव राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. हे तेच गावंडे आहेत, ज्यांनी यापूर्वी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी ‘व्हिसल ब्लोअर’ म्हणून तक्रार केली होती. त्यांच्या याच तक्रारीमुळे खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
खडसे घेणार पत्रकार परिषद
हेमंत गावंडे यांच्यावर आता स्वतःच शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्याने, एकनाथ खडसे यांना राजकीय पलटवार करण्याची संधी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडसे लवकरच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील ‘हिशोब चुकता’ करण्याची शक्यता आहे. यामुळे या जमीन घोटाळ्याच्या निमित्ताने खडसे आणि गावंडे यांच्यातील जुने वैर पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.







