Pune News: दौंड: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दौंडचे आमदार राहुल कुल ( MLA Rahul Kul) यांनी सिंचन, पिण्याचे पाणी आणि खराब झालेल्या चिबड जमिनींच्या समस्यांबाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. 17 मार्च रोजी लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी या विषयांकडे शासनाचे लक्ष वेधले. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विविध उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले.

आमदार राहुल कुल यांनी खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान होणाऱ्या सुमारे 28 कि.मी. लांबीच्या भूमिगत बोगद्याचे काम पुढील 4 वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मोकळी होणारी जमीन शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी वापरावी, अशी मागणी त्यांनी केली. या जागेचा वापर मेट्रो किंवा रस्त्यासाठी करण्याबाबत शासनाने स्वतंत्र धोरण तयार करण्यास सहमती दर्शवली आहे.
मुळशी धरणाचे पाणी भीमा खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावालाही गती मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या संदर्भात मार्च 2024 मध्ये बैठक झाली असून पुढील 2 ते 3 महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दौंड तालुक्यातील 12 ते 14 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्याची मागणीही करण्यात आली. यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी होण्यास मदत होईल. तसेच उजनी बॅकवॉटर परिसरात मोठे बॅरेज उभारण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, पाण्याच्या अतिवापरामुळे खराब झालेल्या चिबड जमिनींच्या सुधारणेसाठी दौंड तालुक्यात पायलट प्रोजेक्ट राबवण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी 100 टक्के शासकीय खर्च करण्यात येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सर्व विषयांवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. यामुळे दौंड तालुक्याच्या विकासाला आणि शेती क्षेत्राला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.






