Baramati Crime: बारामती, ता. 23 : कार लांब फिरवायला नेल्याचा राग मनात धरून तिघांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. जळोची मार्केट यार्डच्या गेटजवळ जळोची (ता. बारामती) येथे गुरुवारी (ता. 19) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण हनुमंत गोसावी, पृथ्वीराज महाविर गोसावी, हिराबाई हनुमंत गोसावी (सर्व रा. जळोची, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रणजित सर्जेराव नाझीरकर असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयुरी राजेंद्र गोसावी (वय 30, रा. पिंपळी, ता. बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयुरी गोसावी यांनी आरोपी करण गोसावी याची ‘टोयोटा ग्लान्झा’ ही कार लांब फिरायला नेली होती. आपली कार विनापरवाना लांब नेल्याचा राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी (ता. 19) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मयुरी गोसावी या त्यांचा मित्र रणजित नाझीरकर याच्यासोबत जळोची मार्केट यार्डच्या गेटजवळ असताना आरोपींनी त्यांना गाठले.
आरोपी करण गोसावी, पृथ्वीराज गोसावी आणि हिराबाई गोसावी हे त्यांच्या महिंद्रा XUV 700 या कारमधून आले. त्यांनी अत्यंत वेगाने कार चालवून रणजित नाझीरकर याला जोराची धडक दिली. या धडकेत रणजित खाली पडल्यानंतर आरोपींनी त्याला घेरले. आरोपींनी मयुरी गोसावी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.
यावेळी आरोपींनी रणजित नाझीरकर यांच्यावर दगडाने आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. त्यांच्या पाठीत, पोटात आणि पायावर गंभीर दुखापत केली. इतक्यावरच न थांबता, आरोपींनी रणजित यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली. या प्रकरणी मयुरी गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार खाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







