पुणे: पुणे (Pune News) जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शुक्रवारी रात्री एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला आहे. या अपघातात लाखणगाव येथील 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून कपिल किशोर वारे असे या मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कपिल हे रात्री ११:३० च्या सुमारास आपल्या दुचाकीने घरी जात असताना अष्टविनायक महामार्गावरून प्रवास करत होते. त्याच वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला त्यांची दुचाकी मागून जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कपिल यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक पंक्चर झाल्यामुळे चालकाने वाहन रस्त्यावरच उभे करून ठेवले होते. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या या ट्रॅक्टरला कोणतेही रिफ्लेक्टर किंवा रेडियम नसल्यामुळे कपिल यांना वाहनाचा अंदाज आला नाही. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने या महामार्गावर ऊसाच्या गाड्यांची मोठी ये-जा असते. अनेकदा ही वाहने रस्त्यातच उभी केली जातात, ज्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण होतो.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र गंभीर दुखापतीमुळे कपिल यांचा जीव वाचू शकला नाही.







