पुणे: पुणे (Pune News) जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय आखाडा आतापासूनच तापू लागला आहे. पण यंदाची लढत केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर ‘मैत्री’ की ‘शत्रुत्व’ हे ठरवणारी असेल, असे दिसतेय. पुण्यात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जवळीक वाढताना दिसली, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोयीस्करपणे बाजूला ठेवण्याचे संकेत मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या राजकीय हालचालींमागे सर्वात मोठे कारण म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांचा पवित्रा हा आहे. भाजपच्या कोअर कमिटीत कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे आपला विरोधाचा सूर लावला आहे. पुणे ग्रामीणमध्ये वर्षानुवर्षे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष राहिला आहे. ” ज्यांना आम्ही विरोध केला, त्यांच्याच सोबत युती कशी करायची?” असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. परिणामी, भाजप आणि शिंदे गटाने तूर्तास सोबतीला येण्याचे ठरवले आहे.
मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे आणि राहुल कुल या नेत्यांच्या बैठकीत केवळ जागावाटपावर चर्चा झाली नाही, तर ग्रामीण पुण्यातील ‘सत्ताकेंद्रांवर’ ताबा कसा मिळवायचा, याचा ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आला. वर्षानुवर्षे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी “सत्ता असलेल्यांनी काय केले?” हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला जाणार आहे.
महायुतीमध्ये राज्य पातळीवर सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले जात असले तरी, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मात्र ‘स्थानिक स्वाभिमान’ आणि ‘जागांचा हट्ट’ आडवा येत आहे. राष्ट्रवादीला (अजित पवार गट) सोबत न घेता निवडणूक लढवल्यास भाजप-शिवसेनेला त्यांच्या हक्काच्या जागांवर उमेदवार उभे करण्याची मोकळीक मिळेल. मात्र, यामुळे महायुतीच्या एकीत फूट पडणार का? हा मोठा प्रश्न आहे.






