पुणे: पुण्यामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाला वडिलोपार्जित जमीन विक्रीतून मिळाल्याचे समजताच त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. तेलंगणामधील जमीन विकून या कुटुंबाला एकूण 3 कोटी रुपये मिळाले होते. मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे कुटुंब नवीन घराच्या शोधात असताना आरोपींना त्यांच्याजवळ असलेल्या पैशांची माहिती मिळाली आणि आरोपींनी फसवणुकीचा मोठा कट रचला. दरम्यान, कुटुंबाच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन, त्यांना घर खरेदीसाठी वादग्रस्त जागा दाखवत त्या कायदेशीर करण्यासाठी वेळोवेळी पैसे उकळून एकूण 27 लाख 65 हजार रुपयांची मोठी फसवणूक करण्यात आली.

या गंभीर गुन्ह्याप्रकरणी एका 54 वर्षांच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी रमेश भंडारी (वय 35), फैयाज शेख (वय 36), अनिता गवळी ऊर्फ बिलोरिया (वय 50), अक्षय गवळी (वय 28) आणि बंदीशकोळ (वय 36) अशा पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सुरुवातीला, रमेश भंडारी याने मध्यस्थी करण्याचे आश्वासन दिले आणि 30 लाख रुपयांच्या बजेटमध्ये खडकी येथील एक दुमजली बंगला 37 लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखवले. टोकन म्हणून 7 लाख 50 हजार रुपये आरोपी बंदीश कोळ याच्या खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. मात्र, बंगल्याची कागदपत्रे अपूर्ण आणि अनधिकृत असल्याचे उघडकीस आल्यावर कुटुंबियांनी पैसे परत मागितले. तेव्हा आरोपींनी पैसे परत मिळणार नाहीत अशी धमकी दिली. त्यानंतर, अनिता गवळीच्या बोपखेल येथील एका वादग्रस्त जागेवरील ’84 क’ शेरा काढून देण्याच्या बहाण्याने अक्षय गवळीने कुटुंबाकडून आणखी 10 लाख रुपये उकळले.
वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून गरीब कुटुंबाची आर्थिक पिळवणूक केली गेली. आरोपी पैसे परत देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे अखेर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे हे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.







