सासवड : शहर परिसरात जुन्या वादातून एका डॉक्टरला खंडणीसाठी (Pune Crime) मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सामाजिक आणि ग्रामपंचायत (Saswad News) राजकारणातील मतभेदातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून सासवड पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणी डॉ. सुभाष दत्तात्रय शिवतारे (वय 36) यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते व ग्राहक हक्क संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष महेश राऊत यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, “तू ग्रामपंचायत राजकारणात माझे ऐकत नाहीस. तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन. तू बोगस डॉक्टर आहेस. तुझ्या हॉस्पिटलची बदनामी करून तुझे करिअर संपवीन. मी केलेला अर्ज मागे घ्यायचा असेल तर 5 लाख रुपये दे,” अशी धमकी देत आरोपीने शिवीगाळ केली आणि मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर जखमी डॉक्टर उपचारासाठी सासवड ग्रामीण रुग्णालयात गेले असता तेथेही काही आरोपींनी गोंधळ घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अमोल नामदेव पवार, लोकेश महेश राऊत, आदित्य सुनील राऊत, सचिन सुधाकर राऊत, जितेंद्र मारुती राऊत आणि ओम जितेंद्र राऊत यांनी शुभम आणि आकाश जाधव यांना शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित सर्वांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते महेश राऊत यांनी आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली आहे. सासवडमधील खासगी दवाखान्यातील कथित अनियमित सेवेविरोधात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवली होती. तसेच या विषयाचे वार्तांकन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर वैयक्तिक आकसातून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला आहे. माझ्यावर देखील मारहाण करण्यात आली असून मी ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे सासवड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत राजकारण आणि सामाजिक कार्यातील मतभेद आता वैयक्तिक वादात परिवर्तित होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.







