Pune Crime : पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पौड परिसरात एका वकीलाने आपल्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या 20 वर्षीय तरुणीचा विनयभंग (Molestation) करून तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने पौड पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी रितेश सुरेश ढोरे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गेल्या दोन वर्षांपासून आरोपीच्या ऑफिसमध्ये जमिनीच्या कागदपत्रांचे काम पाहत होती. जुलै 2025 पासून आरोपी रितेशने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली होती. तो तरुणीला “तू मला आवडतेस” असे सांगून इतर मुलांशी बोलू नको असे वारंवार सांगत असे. या सततच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने दोन वेळा नोकरी सोडली होती. मात्र पुन्हा त्रास देणार नाही असे आश्वासन देत आरोपीने तिला परत कामावर बोलावले. कामावर परतल्यानंतरही नेहमी आरोपी तिचा फोन आणि सोशल मीडिया अकाउंट तपासत असे. तसेच ती कोणाला फॉलो करते किंवा कोणाशी बोलते यावरूनही तो तिला दमदाटी करत असे.
त्या दिवशी नेमंक काय घडलं?
तरुणीने आरोपीशी बोलणं बंद केलं तरीही तो तिचा छळ करत राहिला. 6 मार्च 2026 रोजी सायंकाळी आरोपीने तरुणीला कामाचे बहाणे सांगून घराबाहेर बोलावले आणि आपल्या कारमध्ये बसवून मुळशीच्या दिशेला नेले. गाडीत त्याने तरुणीला पुन्हा इतर मुलांशी बोलण्यावरून जाब विचारला आणि हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने गाडीतील स्टीलच्या बाटली तरुणीच्या डोक्यात मारली आणि तिला धरणात उडी मारून जीव देण्याची धमकी दिली. यादरम्यान त्याने तरुणीशी झटापट करून तिचा विनयभंग केला आणि तिचे कपडे फाडले.
घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा केल्यावर आणि घरच्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने तिला कोळवण रोडवर सोडून पळ काढला. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने आपल्या कुटुंबासह पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पौड पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आरोपी वकीलावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.







