Pune Crime: पुणे: पुणे (Pune) जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत असून किरकोळ कारणावरून होणाऱ्या वादांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. खेड तालुक्यातील कुरुळी-चिंचोळी परिसरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. कुत्र्याला दगड मारल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी एकावर जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास कुरुळी-चिंचोळी परिसरात फिर्यादी इकलाख जमालुद्दीन सुलेमानी (वय 23) हे आपल्या गाडीत बसले होते. यावेळी परिसरात असलेल्या दोन तरुणांनी एका कुत्र्याला विनाकारण दगड मारला. हे दृश्य पाहून प्राण्याविषयी दया व्यक्त करत इकलाख यांनी त्या तरुणांना मुक्या प्राण्याला दगड का मारता, असा सवाल केला. मात्र या प्रश्नाचा राग मनात धरून संबंधित तरुणांनी वाद घालण्यास सुरुवात केली.
आरोपींनी इकलाख सुलेमानी आणि त्यांचे सहकारी इकरार खान यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. मारहाणीत इकलाख आणि इकरार दोघेही जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून वाद सोडवला आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर 27 डिसेंबर रोजी इकलाख सुलेमानी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रितिककुमार गोपाल बैठा वय 20 आणि मृत्युंजय खेदना बैठा दोघेही राहणार बिहार, यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम लावण्यात आले आहे.
या घटनेचा अधिक तपास आळंदी पोलीस करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. किरकोळ कारणावरून हिंसाचार होत असल्याने नागरिकांनी संयम राखावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






