पुणे: पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक (Pune Crime) असलेल्या भीमाशंकर देवस्थानात दर्शनासाठी गेलेल्या एका महिला शिक्षिकेवर सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिका कुटुंबासह भीमाशंकर देवस्थानात दर्शनासाठी गेली होती. दर्शनासाठी रांगेत असताना मंदिर परिसरात काही ढकलाढकलीचा प्रकार घडला. या प्रकाराबाबत शिक्षिकेने सुरक्षा रक्षकांकडे विचारणा केली असता वाद निर्माण झाला. त्यानंतर निळा शर्ट आणि काळे जॅकेट घातलेल्या एका व्यक्तीसह 4 पुरुष आणि 3 महिला सुरक्षा रक्षकांनी शिक्षिकेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत शिक्षिकेच्या पतीला आणि मुलालाही मारहाण करण्यात आली. त्यांच्याशी शिवीगाळ करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही सांगण्यात येत आहे. मारहाणीदरम्यान शिक्षिकेचा मोबाईल फोन फोडण्यात आला असून त्यात नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर संबंधित शिक्षिकेने मंदिरातील सुरक्षा रक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेतील नेमकी कारणे, मारहाण करणारे सुरक्षा रक्षक आणि त्यांची भूमिका याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
भीमाशंकर देवस्थान हे राज्यातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अशा ठिकाणी महिलांवर मारहाण होण्याची घटना गंभीर मानली जात आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि भाविकांकडून करण्यात येत आहे.







