पुणे: मुळशी तालुक्यातील (Pune Crime) अँबी व्हॅली सिटी परिसरात एका महिलेला (Mulashi News) अश्लील शब्दांनी अपमानित करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत कुमार जैन असे आरोपीचे नाव असून तो मुंबईतील दादर पश्चिम येथील रहिवासी आहे. तो फ्लॅट क्रमांक 606, सहावा मजला, प्लॉट क्रमांक 326, देवरे हाऊस, भवानी शंकर रोड, कबूतरखाना, दादर पश्चिम येथे राहतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांच्या माहितीनुसार फेब्रुवारी 2025 ते जुलै 2025 या कालावधीत मुळशी तालुक्यातील अँबी व्हॅली सिटी येथील वेस्ट लेक परिसरात आरोपीने संबंधित महिलेकडे वारंवार एकटक पाहणे, शेरेबाजी करणे तसेच प्रकल्पाच्या पार्किंग परिसरात तिच्याजवळ जाऊन गैरवर्तन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारांमुळे संबंधित महिलेला मानसिक त्रास सहन करावा लागला.
सतत होत असलेल्या त्रासामुळे अखेर पीडित महिलेने पौड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध महिलेच्या लज्जेला धक्का पोहोचेल असे वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार नरेश येमूल करत आहेत. पोलिसांकडून आरोपीच्या हालचालींबाबत अधिक तपास सुरू असून, पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.







