पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमधील (Pune Politics) शरदचंद्र पवार आणि अजित पवार (Pune Mahapalika Election) गट एकत्र येण्याच्या चर्चांमुळे नाराज झालेले पुण्याचे माजी (Sharad Pawar) महापौर आणि राष्ट्रवादी (Prashant Jagtap) शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नव्या राजकीय वाटचालीला सुरुवात केल्याचे चित्र आहे. बुधवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज ते थेट मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाची शक्यता अधिक बळावली आहे. शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर जगताप नेमके कोणत्या पक्षात जाणार, यावर गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. (Latest Marathi News)

प्रशांत जगतापांचं सूचक विधान
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वाढत असलेल्या जवळीकीच्या चर्चांमुळे प्रशांत जगताप अस्वस्थ असल्याचे समोर आले होते. पुरोगामी विचारांशी तडजोड नको, या भूमिकेतूनच त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी आगामी महापालिका निवडणूक लढवणार असल्याचे आणि आपल्या पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचे सूचक विधान केले होते.
एकनाथ शिंदेंचं आमंत्रण नाकारलं
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रशांत जगताप यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनही प्रवेशाची आमंत्रणे आल्याची चर्चा आहे. मात्र वैचारिक भूमिका आणि पुण्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता त्यांनी काँग्रेसला पसंती दिल्याचे समजते. पुण्यात भाजपविरोधात प्रभावी लढा देण्यासाठी काँग्रेस हाच योग्य पर्याय असल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.
बैठकीचा सस्पेन्स
दरम्यान, आज मुंबईतील काँग्रेस भवनात पुणे महापालिका निवडणूक आणि जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पुण्याचे प्रभारी सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह पुण्यातील स्थानिक नेते उपस्थित आहेत. याच बैठकीच्या वेळेत प्रशांत जगताप मुंबईत दाखल झाल्याने त्यांचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. काँग्रेसमधील सूत्रांनीही जगताप यांच्याशी चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुण्याच्या राजकारणातील हा मोठा बदल आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची समीकरणे कशी बदलतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.







