पुणे: जुन्नर तालुक्यातील निमगिरी येथे जमिनीच्या (Pune Crime) वादातून दारूच्या नशेत (Junnar News) भावजयीवर चाकूने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी दीर पुण्यात पळून आला होता. वारजे माळवाडी पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपासासाठी जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Latest Marathi News)

तुषार निंबा साबळे वय 20 रा. निमगिरी ता. जुन्नर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अरुणा उर्फ शारदा शरद साबळे वय 38 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत महिलेचे पती शरद निंबा साबळे वय 42 यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, शरद साबळे यांच्या वाटणीला आलेल्या जमिनीवर त्यांचा भाऊ तुषार साबळे याने घर बांधले होते. याच कारणावरून दोघा भावांमध्ये सुमारे 4 महिन्यांपूर्वी वाद झाला होता. जमिनीच्या प्रश्नावरून तुषार साबळे हा अनेकदा दारूच्या नशेत शरद साबळे आणि त्यांच्या पत्नीशी भांडण करत असे.
5 जानेवारी रोजी शरद साबळे हे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. सायंकाळी मुले शाळेतून घरी आल्यानंतर तुषार साबळे हा अरुणा उर्फ शारदा साबळे यांच्यावर चाकूने वार करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलांनी आरडाओरडा केल्यावर तुषार साबळे तेथून पळून गेला. छाती व हातावर झालेल्या चाकूच्या वारांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन अरुणा उर्फ शारदा साबळे यांचा घरातच मृत्यू झाला.
घटनेनंतर तुषार साबळे हा फरार झाला होता. तो वारजे परिसरात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा यांना मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांना दिली. त्यानंतर वारजे माळवाडीतील यशोदीप चौक परिसरात सापळा रचण्यात आला. तुषार साबळे तेथे येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, निलेश बडाख यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा, नायकवडे आणि पोलीस अंमलदार चौधरी यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.







