पुणे : बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात पुणे पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी करून 6 बांगलादेशी महिलांसह एका दलालाला ताब्यात घेतले आहे. या महिला भारतात बेकायदेशीररीत्या राहत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात दलालासह अन्य 2 फरार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या संयुक्त पथकाने बुधवार पेठेतील संशयित ठिकाणी तपासणी केली. या वेळी काही महिलांच्या वास्तव्याबाबत संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. संबंधित परिसरात कथित रॅकेट चालवण्यात येत असल्याच्या संशयावरून एका दलालालाही पकडण्यात आले.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास केला जात आहे. ताब्यात घेतलेल्या दलालासह फरार असलेल्या अन्य 2 जणांविरोधात पारपत्र अधिनियम, परकीय नागरिकांशी संबंधित कायदे आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या महिलांना बांगलादेशातून पुण्यात कोणी आणले, त्यांना येथे राहण्यासाठी कोणी मदत केली आणि त्यांच्या ओळखीची कागदपत्रे खरी आहेत की बनावट, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी फरासखाना पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.








