पुणे : मुंढवा परिसरात मुळा-मुठा नदीपात्रात 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नंदिनी दुर्गप्पा गायकवाड असे मृत तरुणीचे नाव असून, ती सर्वोदय कॉलनी, मुंढवा येथील रहिवासी होती. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत तिच्या आईने घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, शनिवारी खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंढवा नदीकाठाजवळ एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, नंदिनीची आई जयलक्ष्मी गायकवाड यांनी मुलीच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

आईने व्यक्त केलेल्या संशयानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदिनीचा मृत्यू अपघातामुळे झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.







