पुणे: लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल या तरुणाला कड्यावरून ढकलून त्याची हत्या केल्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. रितेश हिंगे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. यापूर्वी या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

पोलिसांच्या तपासानुसार, केतनची हत्या करण्यापूर्वी त्याला कायमस्वरूपी अपंग करण्याचा कट रचण्यात आला होता. त्याचे हात-पाय मोडून त्याला अपंग करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रयत्न झाल्याचा संशय तपासातून पुढे आला आहे. या कटात रितेशचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि फॉरेन्सिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपास पुढे नेला. उपलब्ध पुरावे, डिजिटल माहिती आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर रितेशविरोधात ठोस पुरावे मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. न्यायालयाने रितेशला 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तपासादरम्यान पोलिसांना काही डिलीट केलेले चॅट्सही मिळाले आहेत. रितेश आणि चेतन यांच्यातील तसेच रितेश, सिया आणि चेतन यांच्यात झालेल्या संभाषणांची माहिती पोलिसांनी मिळवली. या चॅटमधून रितेशला या प्रकरणाची आधीपासून माहिती असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गुन्हा घडल्यानंतर चेतनने रितेशची भेट घेतली आणि त्याला घटनेची माहिती दिल्याचेही तपासात समोर आले आहे. गुन्ह्याची माहिती असूनही ती पोलिसांपासून लपवल्याचा आरोप रितेशवर आहे.
भारतीय न्याय संहितेच्या कलम 61(2) नुसार गुन्ह्याच्या कटाची माहिती असणे किंवा त्यात सहभागी होणे यासंदर्भात कायदेशीर तरतूद आहे. त्यानुसारही तपास सुरू असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी सांगितले.







