पुणे: बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आज एक (Baramati Election) महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज (ता. 6) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, या निमित्ताने बारामतीच्या राजकारणात नवा अध्याय सुरू (Ajit Pawar) होण्याची चिन्हे दिसत आहेत. दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती आणि आता त्यांच्या वारशाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर येत आहे. (Baramati News)

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आमदार होणे आवश्यक असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवार यांना बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. आज अर्ज दाखल करताना महायुतीकडून शक्तिप्रदर्शन होणार असून, पक्षाचे अनेक मंत्री, आमदार, पदाधिकारी तसेच पवार कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
परंपरेनुसार, सुनेत्रा पवार सकाळी प्रथम श्री क्षेत्र कण्हेरी येथे जाऊन मारुतरायाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्या विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करतील. पुढे बारामतीतील कसबा भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून इंदापूर रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करतील. सकाळी साडेदहा वाजता कविवर्य मोरोपंत सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून, तेथे त्या संवाद साधणार आहेत. त्यानंतर त्या प्रशासकीय भवनात जाऊन अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करतील.
बारामतीच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर हा मतदारसंघ नेहमीच पवार कुटुंबाच्या प्रभावाखाली राहिला आहे. 1967 मध्ये शरद पवार यांनी पहिल्यांदा बारामतीतून निवडणूक लढवली आणि त्यानंतर त्यांनी सलग सहा वेळा विजय मिळवला. 1967 पासून 1990 पर्यंत त्यांनी बारामतीवर मजबूत पकड ठेवली.
यानंतर 1991 मध्ये अजित पवार यांनी बारामतीच्या राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला ते खासदार म्हणून निवडून आले, पण त्याच वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीतून ते बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. तेव्हापासून 2025 पर्यंत जवळपास 35 वर्षे अजित पवार यांनी बारामतीवर वर्चस्व कायम ठेवले. त्यांनी अनेक वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आणि राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदही भूषवले.
1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर अजित पवार यांनी 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा निवडणुकांमध्ये सलग विजय मिळवला. त्यामुळे बारामती हा मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. 1967 पासून 2026 पर्यंत तब्बल 59 वर्षे पवार कुटुंबाचे वर्चस्व या मतदारसंघावर राहिले आहे.
या मतदारसंघात महिला प्रतिनिधित्वाचा इतिहास पाहिला तर 1962 मध्ये मालतीबाई शिरोळे या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून आमदार झाल्या होत्या. त्यानंतर आता सुनेत्रा पवार या दुसऱ्या महिला आमदार होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
विशेष म्हणजे, 1991 मधील घडामोडींची काहीशी पुनरावृत्ती यावेळी दिसत आहे. त्यावेळी अजित पवार खासदार झाले आणि नंतर पोटनिवडणुकीतून आमदार झाले. आता सुनेत्रा पवार सुद्धा राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत गेल्या आणि आता पोटनिवडणुकीतून आमदार होण्याच्या तयारीत आहेत.
आज अर्ज दाखल होत असताना बारामतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पवार कुटुंबाचा वारसा, कार्यकर्त्यांची ताकद आणि मतदारसंघातील जुना विश्वास या सगळ्यांच्या जोरावर सुनेत्रा पवार यांची ही लढत महत्त्वाची ठरणार आहे. बारामतीकर काय निर्णय देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







