राहुलकुमार अवचट

यवत: पुणे जिल्ह्यातील यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. कासुर्डी येथे भरतगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पिराच्या मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज कचरू सय्यद (वय 30, रा. कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे) याला 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 5.20 वाजता ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून विनापरवाना एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 15 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलिस हवालदार गुरुनाथ गायकवाड यांनी फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरुद्ध यवत पोलीस ठाणे येथे बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.
स्थानिक परिसरात या कारवाईमुळे खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.







