जुन्नर: राज्यात अजित पवार (Maharashtra Politics) यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेला वेग आला असतानाच त्याची पहिली ठोस झलक (Junnar News) पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात (Ajit Pawar Death) पाहायला मिळाली आहे. स्थानिक पातळीवर अजित पवार गट आणि शरद पवार गट (Amol Kolhe) यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी आमदार अतुल बेनके यांनी दिली.

अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अशी भूमिका मांडली आहे. अजित पवार यांनाही दोन्ही गटांनी एकत्र काम करावे, अशी इच्छा होती, असा दावा त्यांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जुन्नरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही गटांनी एकत्र लढण्याचा प्रयोग केला.
अतुल बेनके यांनी सांगितले की, मी आणि खासदार अमोल कोल्हे यांनी चर्चा करून जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला. मतांची विभागणी होऊ नये आणि तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कायम राहावी, हा त्यामागचा उद्देश होता. पुढे राज्यात काय होईल हे सांगता येत नसले तरी जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित वाटचाल करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीतील विजयी उमेदवारांची बैठक घेतली. अजित पवारांचा कामाचा वारसा पुढे नेण्यासाठी सकारात्मक आणि एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. जुन्नरमधील दोन्ही गटांचे पदाधिकारी त्यांना भेटले असता, स्थानिक स्तरावर एकत्र राहण्याच्या निर्णयाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा बेनके यांनी केला.
जुन्नरमधील हा प्रयोग यशस्वी ठरल्यास राज्यातील इतर भागांतही दोन्ही राष्ट्रवादींच्या सहकार्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे पुढील काही महिन्यांत राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.







