लोणी काळभोर, ता.13: रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी (Loni Kalbhor News) किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकानातील रोख रकमेसह वस्तू चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एंजल शाळेजवळ असलेल्या गणेश किराणा अँड जनरल स्टोअर्स मध्ये शुक्रवारी (ता.13) पहाटे पानवे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

गणेश ज्ञानोबा पवार (वय 35, स्टार सिटी, कवडी माळवाडी, कदमवाकवस्ती, ता.हवेली, जिल्हा पुणे) असे चोरी झालेल्या दुकानाच्या मालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश पवार यांनी मागील एक महिन्यापूर्वीच हे किराणा दुकान सुरू केले होते. पवार यांनी नेहमीप्रमाणे गुरुवारी (ता.12) रात्री साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले होते.
दरम्यान, गुरुवारी (ता.12) रात्री पानवे तीन वाजण्याच्या सुमारास तीन चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी लोखंडी कटावणीच्या सहाय्याने दुकानाचे शटर उचकटले. आणि दुकानातील 7 ते 8 हजार रुपयांची रोकड व किराणा दुकानातील एक गोणी भरून वस्तू चोरी घेऊन गेले.
शुक्रवारी (ता.13) सकाळी सात वाजता शेजाऱ्यांनी पवार यांना फोन करून सांगितले की, तुमचे दुकान फोडले आहे. त्यानंतर पवार तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पवार यांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार विलास शिंदे, पोलिस अंमलदार सूरज कुंभार, अशोक गिरी व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.







