लोणी काळभोर, ता. 2 : ब्यूटी पार्लर चालविणाऱ्या महिलेसह गावातील अनेक स्त्रियांचे फोटो मॉर्फ करून सोशल मिडीयावर व्हायरल केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर परिसरात 5 नोव्हेंबर व त्यापूर्वी वारंवार घडली आहे.

याप्रकरणी एका 40 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लोणी काळभोर परिसरात एक ब्युटी पार्लर चालवितात. फिर्यादी यांचे फेसबुक या सोशल मिडीयावर खाते आहे.
अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांचे फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून त्यावर फिर्यादी यांचे फोटो मॉर्फ करून टाकले. तसेच गावातील इतर ओळखीच्या महिलांचे व मैत्रिणीचे फोटो अश्लिल / न्युड फोटो एडीट करुन फेसबुक सोशल मिडीया साईटवर प्रसारीत केले आहेत. स्त्रियांचे फोटो मॉर्फ करून सोशल मिडीयावर व्हायरल केल्यामुळे फिर्यादी व अनेक स्त्रियांचा विनयभंग करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली व सर्व महिलांची बदनामी केली आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 75ए, 356 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (सी), 66(बी), 66(ई),67, 67 (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील करत आहेत.







