लोणी काळभोर, ता.29: महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका 18 वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एम आय टी कॉर्नर परिसरात घडली असून सोमवारी (ता. 29) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Loni Kalbhor News)

आदित्य धनंजय नागरगोजे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे मामा ज्ञानेश्वर रामकृष्ण आंधळे (वय 41, रा. किनगाव, अहमदपूर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य नागरगोजे हा लोणी काळभोर येथील एका नामांकित महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. परंतु, आदित्य नागरगोजे हा सोमवारी सकाळी राहत्या घरात फॅनच्या अँगलला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलिस हवालदार राणी खामकर, वैशाली नागवडे, बीट मार्शन निखिल मेमाणे, शिंगाडे घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी आदित्य नागरगोजे याला खाली उतरून लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, येथील डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, आदित्य नागरगोजे याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदन करण्यासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल. आदित्य नागरगोजे याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.







