जेजुरी: पुणे (Jejuri News) जिल्ह्यातील जेजुरी येथे भरलेल्या गाढवांच्या बाजाराची मोठी चर्चा होत आहे. दरवर्षी पौष पौर्णिमेला या ठिकाणी गाढवांचा मोठा बाजार भरतो आणि यावर्षी एका काठेवाडी जातीच्या गाढवाला चक्क 150000 रुपये इतकी विक्रमी किंमत मिळाली आहे. या बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांतून व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी होतात. दोन दिवसांच्या या काळात गाढवांची मोठी खरेदी विक्री होऊन लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी पाहायला मिळते.

भटक्या विमुक्त समाजातील बांधव जेजुरीत एकत्र येतात, तेव्हाच हा पारंपरिक बाजार भरवला जातो. पूर्वी येथे जात पंचायत भरायची, मात्र आता त्यावर बंदी असूनही गाढवांच्या व्यापाराची परंपरा मात्र कायम आहे. बाजारात गाढवांची किंमत त्यांच्या जातीवर आणि वयावर अवलंबून असते. विशेषतः गाढवाचे दात पाहून व्यापारी त्याची किंमत ठरवतात. या बाजारात गावरान आणि काठेवाडी अशा दोन प्रकारच्या गाढवांना सर्वाधिक मागणी असून त्यांची किंमत 60000 रुपयांपासून सुरू होऊन 150000 रुपयांपर्यंत जाते.
वीटभट्टी व्यवसाय आणि मालाची ने-आण करण्यासाठी या गाढवांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेक व्यापारी गुजरात मधील राजकोट येथून ही गाढवे खरेदी करून जेजुरीच्या बाजारात विक्रीसाठी आणतात. प्रामुख्याने जड कामांसाठी या प्राण्यांची मोठी मागणी असते. जेजुरी प्रमाणेच मढी आणि माळेगाव येथेही असे बाजार भरतात, परंतु जेजुरीच्या बाजाराची ऐतिहासिक परंपरा आजही टिकून आहे. यावर्षीच्या बाजारात झालेली मोठी आर्थिक उलाढाल व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे.







