संतोष पवार

इंदापूर: भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ऐतिहासिक (Indapur News) ब्रिटिशकालीन तलाव सध्या विविध देशी-विदेशी पक्ष्यांच्या आगमनामुळे निसर्गप्रेमी (Pune News) व पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. अत्यंत देखण्या चित्रबलाक पक्ष्यांची येथे विणीच्या हंगामासाठी मोठी लगबग सुरू असून तलावातील दाट काटेरी बाभळीच्या झाडांवर थाटलेली घरटी पाहणे हा पक्षी निरीक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये थंडी वाढल्यानंतर चित्रबलाकांचे आगमन होते. चित्रबलाकांचा सुरक्षित अधिवास म्हणून ओळखला जाणारा भादलवाडी तलाव घरटी बांधण्यासाठी पाण्याने वेढलेल्या काटेरी बाभळीच्या झाडांना प्राधान्य देतो. सध्या तलावात मुबलक पाणीसाठा असल्याने शेकडो चित्रबलाकांनी या झाडांवर घरटी बांधण्यास सुरुवात केली आहे. काही मादी पक्ष्यांनी अंडी घातल्याचेही दिसून येत असून नर-मादी मिळून घरट्यांची बांधणी व पिलांच्या संगोपनाची तयारी करत असल्याचे दृश्य दिसत आहे.
आगामी काही महिने चित्रबलाकांचा मुक्काम येथे असतो. याच ठिकाणी पिल्लांना जन्म देऊन त्यांचे संगोपन केले जाते. तलावातील नैसर्गिक खाद्य पिल्लांना पुरविले जाते. पिल्लांच्या पंखांना बळ आल्यावर हे पक्षी पुढील प्रवासासाठी येथून मार्गस्थ होतात.

उजनीच्या बॅकवॉटरप्रमाणेच भादलवाडी तलावही हळूहळू पक्षी पर्यटनासाठी नावारूपास येत आहे. ब्रिटिशकालीन बांधकाम असलेला हा तलाव चित्रबलाकांच्या सारंगागारामुळे जगाच्या नकाशावर पोहोचला आहे. तलावातील दाट काटेरी झाडी तसेच चित्रबलाकांसह राखी बगळे, पाणकावळे यांच्या वसाहतीमुळे येथील जैवविविधता पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. सध्या येथे चित्रबलाकांबरोबरच राखी बगळा, करकोचा, शेकाट्या, विविध प्रकारचे पाणबदक, पाणकावळे तसेच काही शिकारी पक्षी पाहायला मिळत आहेत.
तलाव संवर्धनाची गरज
भादलवाडी तलाव हा चित्रबलाकांसाठी अत्यंत सुरक्षित अधिवास मानला जातो. गेल्या काही वर्षांत येथे पक्ष्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र तलाव व त्यातील काटेरी झाडांचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. तसेच वसाहतीच्या झाडांपर्यंत पाणीसाठा कायम राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी वेळोवेळी खडकवासला कालव्याच्या आवर्तनातून पाणी सोडण्याची आवश्यकता असल्याचे पक्षी निरीक्षक दत्तात्रेय लांघी यांनी सांगितले. उजनी परिसरात येणाऱ्या पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी भादलवाडी तलाव हे एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.






