लोणी काळभोर, ता. 24 : पूर्व हवेली परिसरातील अनेक मंगल कार्यालयांमध्ये (Haveli News) वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लग्नसमारंभांसाठी ग्राहकांकडून लाखो रुपये आकारले जात असतानाही मूलभूत सुरक्षेच्या सुविधा उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. अनेक ठिकाणी साधे सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याने चोरट्यांसाठी ही मंगल कार्यालये अक्षरशः मोकळे मैदान बनल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. (Latest Marathi News)

मागील काही काळात लग्नसमारंभ, साखरपुडा, वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमांच्या वेळी चोरीच्या घटना वारंवार घडल्याची माहिती समोर येत आहे. कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांच्या दागिन्यांवर, मोबाईलवर तसेच रोख रकमांवर चोरट्यांचा डोळा असल्याचे अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी महिलांच्या पर्स, तर काही ठिकाणी मौल्यवान वस्तू क्षणार्धात लंपास झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मात्र या घटनांनंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही.
धक्कादायक बाब म्हणजे, अनेक मंगल कार्यालयांमध्ये अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. काही ठिकाणी कॅमेरे बसवले असले तरी ते बंद अवस्थेत असल्याचे सांगितले जाते. सुरक्षा रक्षकांची कोणतीही व्यवस्था नाही, पार्किंग व्यवस्थापन नाही, पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी कोणतेही नियोजन नाही. अशा अनेक त्रुटी उघड होत आहेत. मात्र याकडे कार्यालय चालकांचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
बुकिंगच्या वेळी मात्र मोठमोठ्या जाहिराती करून आणि आकर्षक सुविधा दाखवून लाखो रुपये आकारले जातात. परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी मूलभूत सुविधांचा देखील अभाव असतो. सुरक्षा हा तर पूर्णपणे दुर्लक्षित विषय झाला आहे. त्यामुळे ग्राहकांचा पैसा अक्षरशः पाण्यात जात आहे.या सर्व प्रकारात पोलिस प्रशासनाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वारंवार चोरीच्या घटना घडत असतानाही अद्याप एकाही प्रकरणाचा ठोस तपास लागलेला नाही. चोरटे कोण, ते कसे येतात, त्यांचे जाळे काय आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंगल कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्यामुळे चोरट्यांसाठी हे सोपे लक्ष्य ठरत आहे. बाहेरून येणाऱ्या संशयित व्यक्तींवर कोणीही नजर ठेवत नाही. कार्यक्रम संपल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येते आणि तोपर्यंत चोरटे पसार झालेले असतात. त्यामुळे पोलिस तपासही अनेकदा निष्फळ ठरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मंगल कार्यालय मालकांवर कठोर नियम लागू करावेत, सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करावेत, सुरक्षा रक्षक ठेवणे बंधनकारक करावे आणि वारंवार चोरी होणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, इतक्या घटना घडूनही पोलिस प्रशासनाकडून ठोस आणि परिणामकारक कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगी चोरीची भीती मनात ठेवून कार्यक्रम करावा लागणे ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आता पूर्व हवेलीतील मंगल कार्यालयांवर पोलिस प्रशासन कडक कारवाई करणार का, सुरक्षा नियमांची अंमलबजावणी होणार का, की हा विषय नेहमीप्रमाणे दुर्लक्षित राहणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. नागरिक मात्र ठोस निर्णयाची वाट पाहत आहेत.
लग्नसमारंभ चोरट्यांच्या रडारवर!
कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील कुंजीरलॉन्स या मंगल कार्यालयात 8 नोव्हेंबर 2025 ला पार पडलेल्या विवाह सोहळ्यात नमीता सुभाष मोरे (वय 54, रा. हडपसर, पुणे) यांचे सुनेसाठी ठेवलेले सुमारे 7 लाख 50 हजार रुपयांचे स्त्रीधन चोरट्यांनी लंपास केले. त्यानंतर धनश्री लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात सुभाष किसन हगवणे (वय 65, नायगाव) आणि बाळासाहेब सुदाम पवार यांच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्यांच्या सोन्याच्या साखळ्या 16 नोव्हेंबरला चोरून नेण्यात आल्या. थेऊर येथील वृंदावन पॅलेस मंगल कार्यालयात अच्युत भालचंद्र भगत यांच्या सुनेसाठी ठेवलेले दागिने व रोख रक्कम असा जवळपास 14 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तसेच धनश्री लॉन्समधील विवाह सोहळ्यात चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलिस मारुती बाबुराव काळे (वय 71, रुपीनगर, बेकराईनगर, पुणे ) यांच्या गळ्यातील अडीज तोळ्याची सोनसकळी 20 फेब्रुवारीला चोरून नेली आहे. त्यामुळे लग्नसमारंभ चोरट्यांच्या रडारवर आल्याचे दिसून येत आहे.







