हडपसर, ता. 19 : रिक्षाचे भाडे मागितल्याचा राग मनात धरून एका प्रवाशाने रिक्षाचालकावर दगडाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथील गाडीतळ परिसरात 18 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून हडपसर पोलिसांनी आरोपी प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी ईश्वर बरोडा पवार (वय 37, रा. वैदुवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भागवत गुंडप्पा वाले (वय 25, रा. केशव चौक, माळवाडी, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे रिक्षाचालक असून रिक्षा व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ईश्वर पवार यांनी वैदुवाडी चौकातून तीन प्रवासी घेऊन हडपसरकडे प्रवास सुरू केला होता. रात्री आठच्या सुमारास गाडीतळ परिसरातील अग्रवाल पान शॉपजवळ एक पुरुष प्रवासी खाली उतरला. त्यावेळी पवार यांनी त्याच्याकडे रिक्षाचे भाडे मागितले असता, “कसले भाडे?” असे म्हणत त्याने वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद वाढल्यानंतर संबंधित प्रवाशाने शिवीगाळ करत रस्त्याच्या कडेला पडलेला दगड उचलून ईश्वर पवार यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात ते जखमी झाले. योगायोगाने त्यांचा मित्र लक्ष्मण शिंदे घटनास्थळी उपस्थित होता. त्याने तातडीने धाव घेत आरोपीला पकडून रिक्षामध्ये बसवले आणि दोघेही हडपसर पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या प्रवाशाने नाव भागवत वाले असे सांगितले. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार रविंद्र मुंढ करीत आहेत.







