पुणे : कौटुंबिक न्यायालयाने मुलाला भेटण्याबाबत घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप पतीवर करण्यात आला आहे. न्यायालयाची परवानगी नसतानाही मुलाच्या शाळेत जाऊन त्याची माहिती घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय मुलाला आईपासून दूर नेण्याची धमकी देत विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरोधात येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात 46 वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तिचे पती समीर कोठारी यांना शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाने पुढील 2 महिने मुलाला भेटण्यास मनाई केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांना मुलाची भेट केवळ न्यायालयाच्या परिसरातच घेता येणार होती.
मात्र, या निर्बंधांचे पालन न करता समीर कोठारी यांनी कोंढवा परिसरातील पी. जी. के. एम. स्कूलमध्ये जाऊन मुलाची माहिती घेतल्याचा आरोप आहे. त्यांनी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधून मुलाबाबत चौकशी केली. न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटींच्या विरोधात हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, पतीकडून मुलाला आईपासून दूर नेण्याची धमकी दिली जात असल्याचाही महिलेचा आरोप आहे. या प्रकारामुळे तिचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मुलाच्या मनावरही या घटनांचा परिणाम झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. मुलगा घराबाहेर पडताना किंवा शाळेत जाताना घाबरत असल्याचे महिलेने नमूद केले आहे.

या तक्रारीनंतर पोलिसांनी समीर कोठारी, सासू प्रफुल्ला कोठारी, सासरे सुरेश कोठारी आणि नणंद रिद्धी कोठारी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. येवलेवाडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






