दौंड : यवत दौंड तालुक्यातील रोटी येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जावळ काढण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते व दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी नुकतीच पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. (Daund News)

रोटी गावाचे दैवत असलेल्या श्री रोटमलनाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीने जावळ काढण्याचा कार्यक्रम होत असून, या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काढलेल्या पत्रानंतर हा विषय चर्चेत आला आहे. महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने रोटी गावात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर रविवारी रोटी व परिसरातील शितोळे देशमुख परिवार एकत्र येत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शितोळे परिवार व रोटमलनाथ देवस्थानची बदनामी झाल्याचा आरोप करत रूपाली चाकणकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. या वेळी माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत माजी आमदार रमेश थोरात यांनी जावळ काढण्याची अनेक वर्षांची परंपरा, शितोळे परिवाराची भूमिका तसेच महिलांची बाजू याबाबतची सविस्तर माहिती दिली. महिला आयोगाच्या पत्रामुळे व निर्णयामुळे शितोळे परिवारातील महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत, या प्रकरणाची दोन्ही बाजूंनी शहानिशा करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
दरम्यान, यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रकरणाची योग्य ती चौकशी करून सविस्तर अहवाल महिला आयोगाकडे सादर केला जाईल, असे आश्वासन दिले.







