पुणे: पुण्यातील (Pune News) कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित असलेल्या या वादग्रस्त प्रकरणामुळे अजित पवारांच्याही अडचणी वाढल्या आहेत. मात्र, या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगत त्यांनी या घोटाळ्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे.

नेमका घोटाळा आणि वादग्रस्त व्यवहार
या प्रकरणात 40 एकर (Acre) जमीन जी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केली. या कंपनीने 1804 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. या व्यवहारात 21 कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्काची माफी देखील मिळाली. विशेष म्हणजे, ही जमीन ‘महार वतनी’ प्रकारची असून, तिचे हस्तांतरण नियमांत बसत नाही, असा आरोप आहे.
4 महिन्यांपूर्वीच कल्पना होती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जमीन गैरव्यवहारावर खुलासा करताना, या प्रकरणाची माहिती आपल्याला अगोदरच मिळाली होती, असे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “तीन ते चार महिने आधीच माझ्या कानावर ही गोष्ट आली होती, आणि मी तत्काळ ‘हे असले प्रकार चालणार नाहीत,’ अशा कठोर सूचना संबंधितांना दिल्या होत्या.” याचा स्पष्ट अर्थ असा निघतो की, या घोटाळ्याची कल्पना पवारांना बऱ्याच काळापासून होती.
यावर बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे सांगितले आहे. “चौकशी करणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, “कोणत्याही तक्रारीची सत्यता पडताळणे आणि काय घडले आहे हे तपासणे हे सरकारचे कर्तव्य आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, त्यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, नियमांचे पालन झालेच पाहिजे, मी याच मताचा आहे. “मी आजपर्यंत माझ्या जवळच्या किंवा दूरच्या कोणत्याही नातेवाईकाला फायदा मिळवून देण्यासाठी एकाही सरकारी अधिकाऱ्याला कधीही फोन केलेला नाही.”
या वादग्रस्त जमीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुढे सांगितले कि, “माझ्या नावाचा उपयोग करून नियमांत न बसणारे कोणतेही काम कोणी करत असेल, तर त्याला माझा पाठिंबा नसेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान, पार्थ पवारच्या अडचणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.







