Bhor Politics : भोर: राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भोर नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या झालेल्या या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रामचंद्र आवारे यांनी थोपटे समर्थित उमेदवाराचा 170 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. या निकालामुळे भोरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. (Bhor Politics)

हेही वाचा- निर्जन रस्त्यावर मारहाण करून सोनसाखळी लुटणारा तरुण अटकेत..
भोर नगरपालिका निवडणूक केवळ स्थानिक प्रश्नांपुरती मर्यादित राहिली नव्हती, तर ती प्रतिष्ठेची आणि ताकद दाखवण्याची लढाई ठरली होती. भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भोरमध्ये येऊन सभा घेतल्या होत्या. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आवारे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार, बैठका आणि भेटीगाठी झाल्या. मात्र, अखेरीस मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारावर विश्वास टाकत कौल दिला.
भोर हा परिसर अनेक दशकांपासून काँग्रेसचा आणि थोपटे कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जात होता. या भागातील राजकारणावर थोपटे कुटुंबाचा प्रभाव दीर्घकाळ राहिला आहे. मात्र, अलीकडील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा राजकीय उभारी घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु आमदार शंकर मांडेकर, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीपुढे हा प्रयत्न अपुरा ठरला.
रामचंद्र आवारे यांच्या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निकालानंतर शहरात फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला. या विजयामुळे आगामी काळात भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान भोर नगरपालिकेत जयश्री शिंदे आणि आशु ढवळे या दोन उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने येथील चुरस अधोरेखित झाली आहे. आता विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आमदार शंकर मांडेकर यांनी नगरपालिकेतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून थोपटे यांच्या राजकीय वर्चस्वाला मोठा तडा दिला आहे.






