विशाल शिंदे

भोर: भोर तालुक्यातील संगमनेर गावाच्या ग्रामपंचायत हद्दीत कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जाहिरात फ्लेक्स लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामपंचायत हद्दीत परवानगीशिवाय जाहिरात साहित्य लावण्यावर प्रशासन किती गंभीर आहे, हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी शहाजहान बापुसो बाणदार (वय ५४, व्यवसाय – नोकरी, ग्रामपंचायत अधिकारी, रा. राजतेज सोसायटी, भोलावडे, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी, संगमनेर (ता. भोर) ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी बसस्थानक चौकातून माळवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत, मारूती रामभाऊ वीर (रा. संगमनेर, ता. भोर) या संशयित व्यक्तीने ग्रामपंचायत अथवा कोणत्याही सक्षम विभागाची परवानगी न घेता अनधिकृतपणे जाहिरात फ्लेक्स लावला होता.
सदर फ्लेक्स हा रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्याने सार्वजनिक रस्त्याने ये-जा करणारे नागरिक तसेच बसस्थानक परिसरात उभे असलेले प्रवासी यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झाला होता. तसेच परवानगीशिवाय लावलेल्या या फ्लेक्समुळे सार्वजनिक दृष्टीला बाधा निर्माण होऊन गावाच्या स्वरूपावर प्रतिकूल परिणाम झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
कोणतीही लेखी परवानगी नसताना अशा प्रकारे जाहिरात फ्लेक्स लावणे हे स्पष्टपणे कायद्याचा भंग असून, अशा बाबींवर वेळेत कारवाई होणे अत्यावश्यक असल्याची भूमिका या गुन्हा नोंदणीमधून स्पष्ट झाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ तसेच बी.एन.एस. अॅक्ट २८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अंमलदार म्हणून पोहेकॉ/१९४७ अडवाल यांनी काम पाहिले असून, पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे







