सागर जगदाळे

भिगवण: तक्रारवाडी येथील तहकूब ग्रामसभेत गावाच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला. गावातील शाळेसाठी 12 नवीन वर्गखोल्या बांधण्याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.
या ग्रामसभेत शाळेसाठी 12 वर्गखोल्या बांधण्याचा ठराव चर्चेला आला असताना, ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरली. एकूण नऊ ग्रामपंचायत सदस्यांपैकी केवळ दोनच सदस्य ग्रामसभेत उपस्थित होते. विशेष म्हणजे या दोन उपस्थित सदस्यांमध्ये फक्त सरपंच आणि उपसरपंच यांचाच समावेश होता, तर उर्वरित सात ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित राहिले. लोकप्रतिनिधींच्या या अनुपस्थितीवर उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत खेद नोंदवला.
दरम्यान, उद्याचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तसेच शाळेच्या प्रशासकीय मान्यतेनुसार मंजूर असलेल्या 12 वर्गखोल्या बांधण्याचा ठराव मात्र ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निर्णयाचे उपस्थित पालकांसह ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
या तहकूब ग्रामसभेला सरपंच प्राजक्ता वाघ, उपसरपंच मंदाकिनी मोरे, ग्रामसेविका शोभा जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा काळंगे, भाजपाचे सचिन वाघ, माजी सरपंच शामराव वाघ, तक्रारवाडी शाळेचे माजी मुख्याध्यापक विलास गडकर गुरुजी, शालेय समितीचे अध्यक्ष जयदीप जाधव, संजय मोरे, गणेश वायदंडे, इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस राजेंद्र गोडसे, गणेश जाधव, नवनाथ पाटोळे आणि पिंटू वाळके उपस्थित होते.
शाळेसाठी 12 वर्गखोल्या बांधण्याचा हा ठराव ग्रामसेविका शोभा जाधव यांनी अधिकृतपणे वाचून दाखवून तो प्रोसिडिंगमध्ये घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.







