सागर जगदाळे

भिगवण: सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करून त्यांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भिगवण पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी आरोपीकडून तब्बल ३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासानुसार, आरोपी गणेश शिवाजी कारंडे (वय ४३, रा. श्रीपुर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याने स्वतःचे नाव बदलून ‘संग्राम पाटील’ व ‘पृथ्वीराज पाटील’ या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर खोटे अकाउंट तयार केले होते. पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो वापरून स्वतः पोलिस असल्याची बतावणी करून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केली.
भिगवण पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, आरोपीने फेसबुकद्वारे एका महिलेशी ओळख वाढवून ब्युटी पार्लरसाठी ६ लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखवले. त्यानंतर ‘माझ्या बायकोची बहीण’ म्हणून सही करावी लागेल असे सांगून पीडितेला मौजे मदनवाडी (ता. इंदापूर) येथील लॉजमध्ये बोलावले. तेथे तिला दमदाटी करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि सोन्याचे दागिने, ६,००० रुपये रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ७३ हजार रुपयांचा माल चोरून नेला.
या प्रकरणी गुन्हा रजि. क्र. २३६/२०२५ भिगवण पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ६४, ३०३(२), ३५१(२) अंतर्गत दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.
तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी अकलूज परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले खरे नाव गणेश कारंडे असल्याचे समोर आले. त्याच्याकडून गुन्ह्यातील ३ लाख रुपयांचा मुद्देमाल व गुन्हा करण्यासाठी वापरलेली साधने जप्त करण्यात आली.
आरोपीविरुद्ध यापूर्वीही विविध ठिकाणी अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलिस कस्टडीमध्ये ठेवावे असे सांगण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार महेश उगले, सचिन पवार, संतोष मखरे, प्रमोद गलांडे, गणेश पालसांडे आणि वैष्णवी राऊत (भिगवण पोलिस स्टेशन) यांच्या पथकाने केली आहे.







