Bhigwan kidnapping Case : पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील (Bhigwan kidnapping Case) अपहरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून संबंधित तरुणी मध्यरात्री सुमारे 1.30 वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. ती संबंधित तरुणासह पोलीस ठाण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत पुढील प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणाची माहिती मिळताच तरुणीची आईही पोलीस ठाण्यात पोहोचली. मात्र, तरुणीने आईसोबत जाण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे.

सुधारगृहात रवानगी
यानंतर पोलिसांनी तरुणीला न्यायालयात हजर केले. न्यायालयात तिचा जबाब नोंदवण्यात आला. तसेच वैद्यकीय तपासणी पूर्ण केल्यानंतर तरुणीची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाची चौकशी सुरू असून तपासानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
स्वत: पोलीस ठाण्यात हजर
दरम्यान, तरुणी आणि तरुण भिगवणमधून बाहेर पडल्यानंतर अनेक ठिकाणी गेले होते. त्यांनी श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे आणि सासवड मार्गे महाबळेश्वर येथे प्रवास केला होता. त्यानंतर दोघेही पुन्हा बारामती येथे येऊन स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले.
या प्रकरणाबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व बाजूंची चौकशी केली जात आहे. तरुणीने न्यायालयासमोर तसेच तिच्या कुटुंबियांसमोर तिचे म्हणणे मांडले आहे. मात्र, कुटुंबीयांनी वेगळे आरोप केल्यामुळे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
तरुणीने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ती संबंधित तरुणावर प्रेम करत असल्याचे म्हटले आहे. तसेच घरच्यांनी दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरवल्यामुळे ती स्वतःच्या इच्छेने त्याच्यासोबत गेल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू असून पोलिसांचा तपास सुरू आहे.





