भिगवण (वार्ताहर) सागर जगदाळे

Bhigavan : मदनवाडी येथील राजमाता अहिल्यादेवी चौकातील सांडपाण्याचा प्रश्न कित्येक दिवसांपासून जैसे थे त्या स्थितीतच अडकलेला आहे. चौकातून वाहणारे सांडपाणी, त्याची असह्य दुर्गंधी आणि जबाबदारी ढकलण्याची दुर्दैवी स्पर्धा-यामुळे सामान्य नागरिकांचा रोजचा जीव मेटाकूट होत आहे. कोणाच्या अंगावर जबाबदारी द्यायची, कोणावर दोष टाकायचा, याच्या राजकारणात गावातील माणसांच्या हालअपेष्टा नजरेआड होत आहेत. “थोडी तरी माणुसकी उरली आहे का?”असा सवाल नागरिक विचारत आहेत.
ग्रामपंचायत जरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात असले तरी तात्पुरत्या उपाययोजनांपलीकडे काहीही साध्य झालेले नाही. उलट या तात्पुरत्या सोयींनी लोकांचे जगणे अधिक बिकट केले आहे. शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, कामावर जाणारे नोकरदार, बसची वाट पाहणारे प्रवासी-सगळ्यांनाच या सांडपाण्याच्या नाकातोंडात शिरणाऱ्या दुर्गंधीचा रोज सामना करावा लागतो. Bhigavan
दरम्यान, रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे शिंतोडे पादचार्यांवर उडतात, ही मोठी समस्या बनली आहे. विशेषतः वयोवृद्ध नागरिकांना या पाण्यातून जाणे कठीण जात असून दुर्गंधीचा त्रासही वाढत चालला आहे.
नागरिकांचे आरोग्य, मूलभूत हक्क आणि सुरक्षित वावर याकडे कोणीही लक्ष देत नाही. ना नेता, ना अधिकारी, ना पदाधिकारी-कोणीही या समस्येकडे गांभीर्याने बघत नाही. “सामान्य माणसाचं जीवन म्हणजे इथं एखाद्या किड्यापेक्षाही वाईट आहे का?” असा जळजळीत प्रश्न लोक विचारतात. एसीच्या थंडगार खोलीत बसलेल्या अधिकाऱ्यांना मात्र नागरिकांचा हा त्रास ऐकूही जात नाही. त्यांचे लक्ष फक्त एकाच गोष्टीत-सामान्य माणसाकडून शोषण करून त्यातून ‘मलिदा’ किती मिळणार!
खरा मुद्दा बारामती-राशीण रस्त्याच्या कामानंतर अधिक तीव्र झाला. काम सुरू होण्यापूर्वी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत होता; परंतु काम सुरू झाल्यानंतर ठेकेदार खत्री कन्स्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक काळजी न घेतल्याने निचरा कोलमडला आणि सांडपाणी चौकाच्या मधोमध येऊन साचू लागले. स्थानिकांच्या मते-“कामगारांनी निकृष्ट काम केल्याने हा प्रश्न निर्माण झाला.” ठेकेदाराचे अधिकारी मात्र या गंभीर परिस्थितीकडे जाणूनबुजून काना-डोळा करत आहेत. प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनही उपाययोजना शून्य. “ही तर नागरिकांची चेष्टा आहे,” असे स्थानिक म्हणतात.
आता नागरिकांनी महत्त्वाचा सवाल असा निर्माण केला आहे की या समस्येवर ठोस निर्णय घेणारा, न्याय देणारा आणि नागरिकांना या दुर्गंधीतून मुक्त करणारा अधिकारी आहे तरी कुठे? प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे लोक त्रस्त आहेत, सांडपाण्याचा त्रास रोजच वाढत चालला आहे, पण उपाय? आश्वासनांच्या पलीकडे काहीही नाही.







