पुणे : मालमत्तेच्या वादातून पती आणि त्याच्या मैत्रिणीची हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप पुण्यातील एका प्रकरणातून समोर आला आहे. या प्रकरणात पत्नीने 15 लाख रुपयांची सुपारी दिल्याचा दावा करण्यात आला असून, त्यापैकी 12 लाख 50 हजार रुपये संबंधित तरुणाला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, 49 वर्षीय फिर्यादीने कुटुंबाचा विरोध असतानाही 2006 मध्ये प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आहे. कालांतराने मालमत्तेच्या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाले. 2023 मध्ये पतीचा महाविद्यालयीन काळातील मैत्रिणीशी पुन्हा संपर्क झाल्यानंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाल्याचे सांगितले जाते. घरातील वादानंतर पती पत्नीपासून वेगळा राहण्यासाठी आपल्या आईकडे गेला होता. त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी पत्नीने खासगी गुप्तहेर नेमल्याचाही आरोप आहे.
या घटनेबाबत 20 सप्टेंबर 2026 रोजी फिर्यादीला माहिती मिळाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांच्या भाच्याने भेट घेऊन कथित हत्येच्या कटाविषयी सांगितले. त्याच्या दाव्यानुसार, पत्नी, तिची आई आणि मामा यांनी पती व त्याच्या मैत्रिणीला ठार मारण्यासाठी त्याच्याशी चर्चा केली होती.

मार्च 2026 पासून वेगवेगळ्या टप्प्यांत 12 लाख 50 हजार रुपये मिळाल्याचे संबंधित तरुणाने सांगितल्याचा दावा आहे. यापूर्वीही काही जणांकडे हे काम सोपवण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र तो यशस्वी झाला नसल्याचे त्याने सांगितले. या कथित कटाशी संबंधित मोबाईलवरील संभाषणाचे रेकॉर्डिंगही त्याने फिर्यादीला ऐकवले.

त्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. आंबेगाव पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर पुढील तपास करत आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.






