लोणी काळभोर, ता. २६ : कुंजीरवाडी (ता. हवेली) परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली होती. खासगी क्लासला गेल्यानंतर ती रहस्यमयरीत्या गायब झाली आणि त्यानंतर तब्बल दीड महिना लोणी काळभोर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. आरोपी अत्यंत शातिर होता. तो कोणताही मोबाईल वापरत नव्हता, ठिकठिकाणी ठिकाणे बदलत होता आणि पोलिसांची दिशाभूल करत होता. मात्र, “कायद्याचे हात खूप लांब असतात” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आरोपीची फक्त एक छोटीशी चूक त्याला थेट लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात घेऊन आली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करून तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. या संपूर्ण कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

समाधान उर्फ सुशील गंगाधर सूर्यवंशी (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी परिसरातील नामांकित शाळेत नववीत शिकणारी संबंधित मुलगी नियमितपणे खासगी कोचिंग क्लासला जात होती. १४ एप्रिल रोजी शाळेला सुट्टी असल्याने सकाळी १० ते ११.३० या वेळेत क्लास होता. सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलीचा भाऊ तिला रिक्षातून क्लासजवळ सोडून बाहेरच थांबला होता.
क्लास सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी बाहेर आले, मात्र त्याची बहिण कुठेच दिसत नव्हती. चौकशी केली असता, “ती क्लासलाच आली नव्हती,” असे शिक्षकांनी सांगितले. हे ऐकताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात शोधाशोध करूनही मुलीचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर कोणीतरी फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत कुटुंबीयांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
८ जिल्ह्यांत तपास, १५ हजार किलोमीटरचा प्रवास
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तपासासाठी तीन विशेष पथके तयार केली. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर, नागपूर आणि सोलापूर या आठ जिल्ह्यांत पोलिसांनी सुमारे १० ते १५ हजार किलोमीटरचा प्रवास केला. तपासादरम्यान तब्बल ५०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली. ८० हून अधिक मोबाईल क्रमांक ट्रॅकिंगवर ठेवण्यात आले. मात्र आरोपी मोबाईल वापरत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाचा दबाव वाढत असतानाही पोलीस रात्रंदिवस मुलीच्या शोधात होते.
आणि एक चूक आरोपीला पडली महागात!
दीड महिन्यांच्या तपासानंतर अचानक आरोपीकडून एक मोठी चूक झाली. आरोपीने रस्त्यावर एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. काही अंतर गेल्यानंतर “एक अर्जंट फोन करायचा आहे,” असे सांगून त्याने त्या युवकाचा मोबाईल घेतला. फोन लावल्यानंतर समोरून आईने कॉल उचलताच आरोपीने फक्त “समाधान कुठे आहे?” एवढेच विचारले आणि तात्काळ कॉल कट केला. त्यानंतर नंबर ब्लॉक करून तो निघून गेला. मात्र, पोलिसांसाठी हाच धागा महत्त्वाचा ठरला. त्या मोबाईलवरून डायल झालेला अनोळखी नंबर पोलिसांनी तातडीने ट्रॅकिंगवर टाकला. तपासात त्या नंबरचे लोकेशन हातकणंगले परिसरात असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, तो भाग कर्नाटक सीमेलगत असल्याने पोलिसांनी तातडीने दोन पथके रवाना केली.
पोलिसांचा सापळा आणि आरोपी बेड्यांत
हातकणंगले परिसरात पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी आणि स्थानिक चौकशी सुरू केली. त्यानंतर संशयित नंबर वापरणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच तो बोलू लागला आणि आरोपी राहत असलेल्या ठिकाणाची माहिती दिली. सुरुवातीला चुकीचे घर दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला.
त्यानंतर पोलिसांनी परिसरातील गावांमध्ये गुप्त माहिती गोळा केली आणि अखेर सापळा रचून समाधान उर्फ सुशील सूर्यवंशी याला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. या थरारक तपास मोहिमेमुळे लोणी काळभोर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अत्यंत संयम, तांत्रिक कौशल्य आणि धाडस दाखवत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
ही उल्लेखनीय कामगिरी लोणी काळभोरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, अरुण जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार अण्णा माने, सागर जगदाळे, निलेश कोल्हे, सुरज कुंभार, पोलीस अंमलदार सचिन सोनवणे, योगेश पाटील, राहुल कर्डिले, प्रवीण धडस, अशोक गिरी, गणेश खरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.







