पुणे: सोन्या-चांदीच्या (Pune Crime) दागिन्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने दागिने चोरी (Pune News) आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. पुण्यातून (Pune Fraud) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून, ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने 65 वर्षीय महिलेची फसवणूक करून तिच्या हातातील सुमारे 1 लाख 80 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दांडेकर पूल परिसरात घडली आहे. (Latest Marathi News)

अनोळखी व्यक्तींनी अडवलं अन्…
ही घटना रविवारी दुपारी घडली असून याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दांडेकर पूल परिसरातील जय महाराष्ट्र मित्रमंडळाजवळून चालत जात होत्या. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून संवाद साधला. आम्ही जुने दागिने किंवा पितळेच्या वस्तू नवीनसारख्या पॉलिश करून देतो, असे सांगत त्यांनी महिलेशी बोलणे सुरू केले.
गोड बोलून विश्वास संपादन करत..
या भामट्यांनी एका खास द्रवाचा वापर करून एक पितळाची वस्तू चमकवून दाखवली. ती वस्तू लखलखीत दिसू लागल्याने महिलेचा त्यांच्यावर विश्वास बसला. विश्वास संपादन केल्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या हातातील सोन्याच्या दोन बांगड्या पॉलिश करण्यासाठी मागितल्या. महिलेने बांगड्या काढून दिल्यानंतर चोरट्यांनी संधी साधून त्या बांगड्या स्वतःकडे ठेवल्या आणि क्षणात तेथून पळ काढला.
महिलेची आरडाओरड
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, या टोळीने याआधीही अशाच प्रकारच्या फसवणुका केल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये, दागिने काढून देऊ नयेत आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन केले आहे.






